औरंगाबाद महापालिकेच्या कामगार कल्याण विभागात तब्बल अडीच कोटी रुपयांचा घोळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ५० रुपये कपात करण्यात येते. मागील २० वर्षामध्ये या रकमेचा तपशीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला नाही.
पतसंस्थेवर नेमलेला कर्मचारीच सर्व हिशेब पाहतो. या अपहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कर्मचान्यांकडून करण्यात येत आहे. औरंगाबाद महापालिकेत साडेचार हजारांवरकर्मचारी होते. त्यातील पन्नास टक्केकर्मचारी निवृत्त झाले आहेत. सध्या मनपाच्या आस्थापनेवर जवळपास अडीच हजार कर्मचारी आहेत. कंत्राटी पद्धतीचे दीड हजार कर्मचारी आहेत.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ५० रुपये कामगार कल्याणच्या नावावर कपात करण्यात येतात. मनपात तत्कालीन कामगार अधिकारी लोखंडे यांच्या कार्यकाळात पैसे कपात करण्याची पद्धत सुरू झाली. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, या हेतूने कामगार कल्याणचे काम सुरू करण्यात आले.
आजही एखादा कर्मचारी मरण पावल्यास, त्याच्या वारसांना अनेक चकरा मारायला लावून फक्त २० हजार रुपये देण्यात येतात. दरमहा एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मनपा कर्मचारी कल्याण निधीत जमा होते. दरवर्षी १२ लाख रुपये जमा होतात. मागील २० वर्षांत किमान अडीच कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. ही रक्कम नेमकी गेली कुठे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
0 Comments