एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याची रेकॉडींग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. दरम्यान, संतप्त झालेल्या समाजबांधवांकडे संशयितांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. यामुळे शहर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या संजू बिसमिल्ला पटेल (रा. राजमालती नगर) व राजू बिसमिल्ला पटेल (रा. द्वारकानगर) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राजमालती नगरातील संजू पटेल या तरुणाने राजू भाट या तरुणासोबत मोबाईलवरुन संभाषण केले आहे. या संभाषणात संजू पटेल याने एका समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. दरम्यान, काही समाजबांधवांनी ही रेकॉर्डींग ऐकली. यामध्ये संशयित संजू पटेल याने एका समाजाबद्दल गुंडगिरीची भाषा वापरली आहे. संतप्त झालेल्या समाजबांधवांनी शहर पोलिसात धाव घेत संशयितांवर कारवाईची मागणी केली. परंतु पोलिसांकडून कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला.
कारवाईनंतर जमाव शांत
शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने समाजबांधवांकडून आंदोलन केले जात असल्याचे समजताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी त्यांनी समाजबांधवांशी चर्चा करुन संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळून जमाव शांत करण्यात आला होता.
अतिरीक्त पोलिसांचा बंदोबस्त
कारवाई करण्याच्या मागणीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलीस मुख्यालयातून अतिरीक्त पोलिसांचा बंदोबस्त मागण्यात आला होता. तसेच क्युआरटी पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण
रेकॉर्डींग सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच समाजबांधवांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एका संशयिताला अटक
आक्षेपार्ह वक्तव्य करणारा संजू पटेल व राजू पटेल या दोघ भावंडांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित संजू पटेल याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप गावित हे करीत आहेत.
यापुर्वीही केले होते आक्षेपार्ह वक्तव्य
संशयित संजू पटेल याने यापुर्वीही एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पुन्हा त्याने समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेे असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
0 Comments