मिनू प्रमोद गांधी (५३,रा. कृपा साईधाम सोसायटी, नवीन हनुमान मंदिराजवळ, ठाकुर्ली पूर्व) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मिनू यांच्यासह रंजना मिलिंद निकाळे (५६), जयश्री नीलेश श्रीराम (३७), पुनम राजेश सिंह (३०) अशी फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत. या महिला ठाकुर्ली भागात राहतात.
सोहनसिंह चैनसिंह धसाना (५०, रा. महालक्ष्मी ज्वेलर्स, अंकीता नगरी सोसायटी, ठाकुर्ली पूर्व) असे आरोपी जवाहिऱ्याचे नाव आहे. जून २०२१ ते जून २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, मिनू गांधी यांच्यासह फसवणूक झालेल्या इतर तीन महिलांना जवाहिर सोहनसिंह याने गेल्या वर्षी तुम्ही माझ्याकडे दागिने गहाण ठेवा त्या दागिन्यांच्या किमतीप्रमाणे मी तुम्हाला कर्ज देतो असे सांगितले. तर काही महिलांना मी तुमचे दागिने घडवून देतो. त्या बदल्यात काही रक्कम आगाऊ घेतली. या महिलांचा विश्वास संपादन करुन त्याने हा घोटाळा केला होता. वर्ष होत आले तरी आपणास कर्ज नाहीच, घडणावळीचे दागिने मिळत नाहीत म्हणून या महिलांनी सोहनसिंह याच्याकडे दागिने परत करण्याची, पैसे परत देण्याची मागणी सुरू केली. सुरुवातीला सोहनसिंह याने तुम्हाला कर्ज, दागिने देतो असे सांगून वेळकाढूपणा सुरू केला. वारंवार त्याची साचेबद्ध् उत्तरे ऐकून महिला संतप्त झाल्या. सोहनसिंह त्यांना उलट उत्तरे देऊ लागला. सोहनसिंह आपणास कर्ज नाहीच पण आपली मूळ रक्कमही परत करत नाही हे लक्षात आल्यावर चारही महिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन जवाहिर सोहनसिंह धसाना विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. उपनिरीक्षक के. पी. वाडकर या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
0 Comments