कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करणार्‍या बहिणीच्या नवर्‍यावर गोळ्या झाडल्या

सावळीविहीर कुटूंबाच्या इच्छेविरोधात जावून लग्न करणार्‍या बहिणीच्या नवर्‍यावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या तरुणाने पदयात्रेने येणार्‍या साईपालखी सोहळ्यात दोन गोळ्या झाडल्या आहेत. यात बहिणीचा नवरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर पळून जाणार्‍या आरोपीला अन्य पदयात्रींनी पकडून चोप दिल्याने तोही जखमी झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विकी भांगे याच्या बहिणीने दोन वर्षापूर्वी निलेश पवार या तरुणाबरोबर कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. मुंबईत वाहन चालक म्हणून काम करणारा निलेशचा सुखी संसार सुरू होता. मात्र कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे विकी भांगे याच्या मनात निलेश पवार याच्या विषयी राग होता. तो निलेशला संपवण्यासाठी संधीच्या शोधातच होता.

मुंबईतील गोरेगावची द्वारकाधीश ही साईंची पायी पालखी दहा पंधरा दिवसांपूर्वी शिर्डीला निघाली. मुंबईतून निलेश पवार व त्याची पत्नी या पालखीतून पायी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले. याबाबतची माहिती पुसद येथे राहणार्‍या विकी भांगेला समजताच त्याने मेहुण्याचा पदयात्रेतच काटा काढण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईपासूनच या पालखीच्या पाळतीवर होता. शिर्डी अगदी पाच किमी अंतरावर आली तरी त्याला योग्य संधी मिळत नव्हती.

अखेर शुक्रवारी दुपारी ही पालखी शिर्डीजवळील सावळीविहीर येथे नाष्टा करण्यासाठी थांबलेली असताना विकीने गावठी कट्ट्यातून मेहुणा निलेश पवार याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या निलेशच्या खांद्याला लागल्या. यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना विकीला पालखीतील अन्य पदयात्रींनी पकडून चांगला चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी गोळीबारात जखमी झालेला निलेश पवार व पदयात्रींच्या मारहाणीत किरकोळ जखमी झालेला आरोपी विकी भांगे या दोघांनाही उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल केले. आरोपी विकी भांगे याच्या विरोधात पोलीसांनी भादंवि कलम 307, 325, 727, आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडील गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e