राम गोंडे (वय ४१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर अनेक फेरीवाले व्यवसाय करत आहेत यापैकीच एक असलेल्या परप्रांतीय भाजीविक्रेता राम गोंडे हा लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालयात न जाता तेथेच रस्त्यावर लघुशंका करू लागला. यावेळी तेथून अनेक महिला देखील ये जा करत होत्या.
त्याचवेळी पोलीस कर्मचारी उदय कदम हे देखील तेथून जात होते. त्यांनी त्याभाजी विक्रेत्याला उघड्यावर लघुशंका करू नकोस अन्यथा तुझ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र, त्यानंतर भाजी विक्रेता आणि पोलीस उदय कदम यांच्यात भांडण सुरू झाले. भाजी विक्रेता राम गोंडे याने त्याच्याजवळ असणारा भाजी साफ करण्याचा चाकू घेऊन कदम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कदम यांच्या हाताला जखम झाली.
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी राम गोंडे याला अटक केली. भादंवि कलम ३५३, ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या उदय कदम यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजते.
0 Comments