राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं होतं. यातून शेतकरी सावरत नाही तोच राज्याला पुन्हा एकदा गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. रविवारी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराज्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पावसाने विदर्भासह मराठवाड्याला झोडपून काढलं आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालं. त्याचबरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात तालुक्यात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला.
या गारपिटीमुळे कांदा पिकाचा अतोनात नुकसान झाले तर उरली सुरली रब्बीची पीक शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता गेली आहेत. आंब्याचे ही मोठे नुकसान झाले आहे. महिनाभरात सलग पाच वेळा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात जसं नुकसान झालं होतं, तेच रब्बी हंगामात झाले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान गारपीट
दुसरीकडे विदर्भात झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.तसंच खरबूज , टरबूज, गहू, सूर्यफूल, आंबा,कांदा, पपई पिकांचं नुकसान झालं आहे. पुण्यात देखील अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. पुणे शहरात सोसाट्याचा वाऱ्यामुळे झाडपडीच्या घटना घडल्या. धायरी परिसरात गारपीट झाली. तर सिंहगड परिसरात झाड उघडल्याने चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले.
अहमदनगरला अवकाळी पावसाचा तडाखा
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीसह राहाता आणि कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर कोपरगाव आणि राहाता शहरासह परिसरात गारपीट झाली. रविवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडटासह पाऊस झाला. काही ठिकाणी विज कोसळली मात्र सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. गारपीटीने कांदा, गहू, द्राक्ष यासह फळबागांच नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढलं. रविवारी नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. या पावसामुले आंबा आणि द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसला. गारपीट यामुळे बीडच्या बेलखंडी पाटोदा गावात आंब्याच्या झाडाला पालासुद्धा राहिला नाही. तर शिमला मिरची त्याबरोबरच टोमॅटो याचां सडा पडला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेलाय. या पिकासाठी केलेला खर्च देखील निघेल की नाही, अशी अवस्था शेतकऱ्याची झालीय. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
अकोल्यात झाड कोसळून ४ जणांचा मृत्यू
अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले. यापैकी चार जणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी आहेत.
0 Comments