याप्रकरणी विकास प्रकाश गायकवाड (वय 38, रा. कुडजे , ता. हवेली जि पुणे) व त्याच्या इतर दोन अज्ञात साथीदारांच्या विरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक महेशकुमार खाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक महेश कुमार खाडे हे कार्यालयीन कामकाज आवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपींनी खाडे यांच्या चार चाकी समोर बिअरची बॉटल फोडून गाडी अडवली. तेथून आरोपींनी खाडे यांना जबरदस्तीने बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलवर नेले व रस्सीने हातपाय बांधले. त्यानंतर एक औषधाची बाटली दाखवत 'आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुला हे औषध पाजून मारून टाकू' अशी धमकी दिली. घाबरलेल्या खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले 49 हजार रुपये व आपल्या मित्राकडून आणखी 24 हजार मागून एकूण 73 हजार रुपये आरोपींना गुगल पे करून दिले. आरोपींनी खाडे यांचा मोबाईल व कारची चावी काढून घेत, 'उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू' अशी धमकी दिली.'पैसे आणून देतो पण मारू नका', असे सांगितल्यानंतर आरोपींनी खाडे यांना सोडून दिले. घडलेला प्रकार खाडे यांनी आपल्या मित्रांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. त्यानुसार उत्तमनगर पोलीस ठाण्यात विकास गायकवाड व इतर दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाले असून पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार याबाबत अधिक तपास करत आहेत.
0 Comments