भारती अमृत चौरे (वय 23 रा.दातर्ती ता.साक्री) असे तिचे नाव आहे. ती डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तर देवपूरातील विद्याभवन लेडीज हॉस्टेल येथे राहत होती. दोन महिन्यापूर्वीच ती या होस्टेलमध्ये दाखल झाली होती. तिच्या खोलीतील तिची मैत्रीण गावाला गेलेली होती. त्यामुळे ती खोलीत एकटीच होती. आज दि. 11 रोजी सकाळच्या सुमारास तीने खोलीतील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी भारती चौरे हीची मैत्रीण तिला बोलवण्यासाठी गेली. तिने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिला शंका आली. त्यामुळे तिने खिडकीमधून पाहिले असता भारती ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली .
तिने आरडाओरड करीत होस्टेलच्या महिला व्यवस्थापकास माहिती दिली. तसेच घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा भारती चौरे हिने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आढळून आली. त्यात तिने आई-पप्पा सॉरी असे लिहीले आहे.दरम्यान भारती चौरे हिला खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत तिला मृत घोषित केले.
ताणतणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेमुळे हॉस्टेलच्या विद्यार्थीनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थीवर्गावर अभ्यासाचा मोठा ताण असल्याचे या प्रकरणावरुन दिसून येत आहे. त्यामुळे ही आत्महत्त्या कोणत्या कारणामुळे झाली? हे स्पष्ट झालेले नाही.
0 Comments