अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष, अत्याचारातून गरोदर, २४ वर्षीय विवाहिताला १२ वर्ष कारावास

दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. अत्याचारातून जन्मलेल्या बाळाच्या डीएनएचे नमुने तसेच रक्त तपासणीचे अहवाल सुद्धा खटल्यात महत्वाचे ठरले.

विवाहित असूनही अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करुन गर्भवती केले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचीही घटना २०२० मध्ये घडली होती. या गुन्ह्यात अत्याचार करणाऱ्या आरोपीला अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शरद सखाराम भिल (वय २४ वर्ष, रा. नारणे ता. धरणगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहते. तिची ओळख शरद भिल याच्यासोबत झाली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. शरद भिल याचे लग्न झालेले होते, असे असतांनाही त्याने मे २०१९ ते मार्च २०२० यादरम्यानच्या काळात पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळावेळी अत्याचार केले.
पीडित मुलीने त्याला लग्नाबाबत सांगितले असता, मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करेन, असं शरद भिल हा अल्पवयीन मुलीला सांगत असे. एके दिवशी शरद भिल हा अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून घेऊन चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील जंगलात आणि मंजरेहोळ शिवारात गेला, या ठिकाणी त्याने 'मी पत्नीला घटस्फोट देणार आहे' असे सांगत दोघे काही दिवस एका दाम्पत्याकडे राहिले, याठिकाणी दोघांनी शेतात काम सुद्धा केले. अशाप्रकारे शरद याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.
मुलीच्या घरी प्रकाराबाबत माहिती पडल्यावर त्यांनीही शरद यास लग्नाबाबत विनंती केली, मात्र होकार देत शरद याने वेळ मारुन नेली, याच दरम्यान अल्पवयीन मुलगी ही गर्भवती असल्याचा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आला. यानंतरही मुलीच्या कुटुंबियांनी शरद भिल यास लग्नाबाबत विचारले, मात्र त्याने टाळाटाळ केली, अखेर याबाबत १९ जून २०२० रोजी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन चोपडा शहर पोलीस ठाण्यात शरद भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

खटला सुरु असताना पीडितेने दिला बाळाला जन्म

गुन्ह्यात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी शरद भिल यास अटक करुन त्याच्याविरोधात अमळनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याच दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला होता. अमळनेर येथील जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या सरकार पक्षापतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. अत्याचारातून जन्मलेल्या लहान बाळाच्या डीएनएचे नमुने तसेच रक्त तपासणीचे अहवाल सुद्धा खटल्यात महत्वाचे ठरले.
पुराव्यानुसार न्यायालयाने आरोपी शरद भिल यास दोषी धरले व त्यास अत्याचार व बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये तब्बल १२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. आर. बी. चौधरी यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील, नितीन कापडणे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e