महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबवण्यात आले. त्यात शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने यात सहभाग घेतला होता.स्पर्धेदरम्यान शहरात सुंदर जलाशय (मुकेश पटेल रिक्रेशन गार्डन तलाव), स्वच्छ व सुंदर रस्ते, सुंदर हरित पट्टे, सुंदर पर्यटन स्थळे आणि सुंदर व्यापारी संकुल अशा निकषांवर कामगिरी बजावण्यात आली. पालिकेतर्फे शहरात शहर सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला. विविध निकषांवर पात्र ठरल्याने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये अ व ब वर्ग नगरपरिषदेतून शिरपूर पालिकेला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथील एन.सी.पी.ए., नरिमन पॉइंट येथे गुरुवारी प्रभारी मुख्याधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.), प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आदि उपस्थित होते. राज्यात प्रथम क्रमांकाची दोन पारितोषिके पटकाविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेचे विशेष कौतुक केले
अभियानातील कामगिरीसाठी प्रभारी मुख्याधिकारी सत्यम गांधी, प्रशासक प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नगर अभियंता माधवराव पाटील, उपमुख्य अधिकारी कल्याणी लाडे, उद्यान पर्यवेक्षक सागर कुळकर्णी, आरोग्य सहाय्यक दीपाली साळुंके, शहर समन्वयक दिव्या तोरीस, घरपट्टी विभाग प्रमुख कैलास चौधरी, वसुली कर्मचाऱ्यांसह शहर प्रकल्प अधिकारी भगवान भामरे, समुदाय संघटक प्रमोद अहिरे व नागेश पुंडगे यांनी प्रयत्न केले.यापूर्वी पालिकेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान (राज्यात प्रथम), संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत पाणीपुरवठा व व्यवस्थापन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पारितोषिक, संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राज्यात प्रथम (सन २००५-०६), वसुंधरा पुरस्कार आदि पुरस्कार पटकावले आहेत.करवसुलीचेही पारितोषिकपालिकेने यावर्षीही मालमत्ता कर वसुलीची उल्लेखनीय परंपरा कायम ठेवून विक्रमी ९२.७२ टक्के करवसुली करून राज्यात अव्वल स्थान पटकावले. त्याबद्दलही पालिकेच्या प्रतिनिधींना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, पथ विक्रेता सर्वेक्षण यामध्येही पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला."पालिका पदाधिकाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांना नागरिकांनी मनापासून दिलेली साथ यामुळे शहराला सन्मान लाभला. आम्ही राबवलेल्या प्रत्येक उपक्रमात नागरिक संपूर्ण सहकार्य देतात. प्रशासन आणि जनता यांच्या समन्वयाचे शिरपूर हे आदर्श उदाहरण आहे. यापुढेही शिरपूर विविध विक्रमांनी सन्मानित होत राहील, अशी सार्थ खात्री आहे. - आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री
0 Comments