आमदार सुहास कांदे यांनी याबाबत तक्रार केली होती. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 4 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार सुहास द्वारकानाथ कांदे (४५, धंदा समाजसेवा, रा. पार्श्व बंगला, पाईपलाईन रोड, आनंदवली, नाशिक) हे नाशिक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असताना एका महिलेने काही इसमांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दि. 10 नोव्हेंबर 2016 रोजी दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-2 चे तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हे करीत होते. माईनकर यांनी गुन्ह्यातील आरोपींना भीती दाखवून मला आरोपी करून विनाकारण या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
त्यादरम्यान, मला अटक होऊ नये यासाठी योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबत होतो. तरीही या गुन्ह्याशी माझा वैयक्तिक कोणताही संबंध नसताना या गुन्ह्यात 23 डिसेंबर 2016 रोजी समजपत्र देऊन पोलीस निरीक्षक माईनकर यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
त्यामुळे मला या गुन्ह्यात अटक होऊन माझ्या राजकीय कारकीर्दीस धोका निर्माण होऊ नये, म्हणून मी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार मला कोर्टाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. त्यानंतर मी तपास अधिकारी माईनकर यांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशीकामी त्यांच्यासमक्ष हजर राहून माझा जबाब दिला होता, असेही कांदे यांनी म्हटले आहे.
माईनकर यांनी मला धमकी देऊन व ब्लॅकमेल करून माझ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याने दि. 7 जानेवारी 2017 रोजी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे 9 जानेवारी 2017 रोजी माईनकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल होण्यासाठी अर्ज दिला असल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
परंतु वेगवेगळ्या खात्यांकडे तक्रारी देऊनदेखील तेच तपासी अधिकारी असल्याने वेळोवेळी त्यांनी मला "माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला केसेसमध्ये पुरता अडकवीन, " अशा धमक्या देऊन दबाव आणत बेकायदेशीर रकमेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व गोष्टींची शहानिशा करून कांदे यांना दोषमुक्त केले होते. उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाल्याने कांदे यांनी माईनकर यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम 156 (3) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्ट नं. 6 यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माईनकर यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 384, 385, 389 सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 13 प्रमाणे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत.
0 Comments