ढंढाणे येथील बालविवाह पोलिसांनी रोखला; मेथी येथील अल्पवयीन मुलीच्या पालकांना समज

ढंढाणे (ता. नंदुरबार) येथे मेथी (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह बुधवारी (ता. १०) पोलिसांनी विवाहस्थळी जाऊन रोखला. वधू व वरपक्षाच्या पालकांची समजूत घालून त्यांना बालविवाहाचे धोके व कायद्याने असलेल्या गुन्ह्याविषयी माहिती देत जनजागृती केली. पालकांच्या लेखी विनंतीनंतर त्यांना समज देत विवाहयोग्य वय झाल्यावर हा विवाह लावण्याची समज देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मेथी (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील अल्पवयीन मुलीचा ढंढाणे (ता. नंदुरबार) येथील मुलासोबत विवाह १० मेस होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पाटील यांनी ही माहिती नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल पवार यांना कळवून पोलिस ठाणे स्तरावरील अक्षता समितीमार्फत हा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशित केले.अक्षता समिती सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता ढंढाणे (ता. नंदुरबार) येथे एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून आले. समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या वर मुलाकडे व त्याच्या कुटुंबीयांकडे मेथी येथील वधू मुलीबाबत विचारपूस केली असता वधू मुलगी त्या ठिकाणी हजर होती
विवाह होण्याच्या आधीच समिती सदस्य त्या ठिकाणी पोचले. त्या वेळी त्यांना मुलीच्या जन्मतारखेबाबत विचारपूस केली असता, मुलीचे वय १७ वर्षे चार महिने असल्याचे त्यांनी सांगितले.अक्षता समितीने तेथे हजर असलेल्या वधू, वर व त्याच्या नातेवाइकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत चर्चा करून त्यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम याची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याची माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करत मनपरिवर्तन केले.अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाइकांना नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना ही बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e