मुक्ताईनगर शहरातील जिजाऊनगरात चेतन सनान्से हे परिवारासह वास्तव्यास आहेत. चेतन सनान्से यांचा सलून व्यवसाय आहे. चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवी हिचा शुक्रवारी (१९ मे) वाढदिवस होता. सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती. वाढदिवस असल्याने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर येथे तिच्या घरी आणण्यात आले होते.
नवीन कपडे आणले पण..
वैष्णवीच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती. तर आई– वडील तिच्यासाठी केक, नवीन कपडे आणण्यात गेले होते. तर वैष्णवी ही काका लखन सनान्से यांच्या घरी गेली होती. तिथून ती तिच्या घरी आली. घराबाहेर चप्पल काढताना तिला कूलरचा शॉक लागला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने वैष्णवी फेकली गेली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित करुन वैष्णवीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैष्णवीची प्राणज्योत मालवली होती. आठ वाजता केक कापून वैष्णवीचा वाढदिवस साजरा केला जाणार होता. तिला नवीन कपडेसुद्धा आणले होते. मात्र वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडिलांसह इतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
0 Comments