पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर परदेशी याला नुकतच मावळ मधील सोमाटणे फाटा येथून दोन गावठी पिस्तूल आणि १६ जिवंत काढतुसासह ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी त्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा अधिकचा तपास दरोडा विरोधी पथक करत होत. तपासामध्ये सुधीर परदेशी याने त्याचा साथीदार शरद साळवी यांच्यामार्फत मध्य प्रदेशातून तीन गावठी पिस्तूल आणि ४० जिवंत काडतुसे आणली होती. पैकी, एक पिस्तूल आणि २४ जिवंत काडतुसे हे चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक लाहोटी यांना देण्यात आले होते. त्यांना पिंपरी- चिंचवडमधून दरोडा विरोधी पथकाने अटक केली. विवेक लाहोटी हे जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतात यात त्यांचा मित्र राजू माळी हा भागीदार होता. परंतु, राजू माळी यांच्यासोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतुन लाहोटी यांनी सुधीर परदेशी यास ५० लाख रुपयांची सुपारी देऊन राजू माळी यांची हत्या करण्याचा कट रचला होता.
दर शनिवारी आणि रविवारी राजू माळी हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बांधकाम साईट येथे भेट देतात, तिथेच ते मुक्काम करतात. ही बाब हेरून त्याच ठिकाणी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. तशी टेहाळणी देखील करण्यात आली होती. मात्र, त्या अगोदरच दरोडा विरोधी पथकाने हत्येचा कट उधळून लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक अमरीश देशमुख, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, सुमित देवकर, गणेश हिंगे, रासकर यांच्या टीमने केली आहे.
0 Comments