सोयगाव इंदिरानगर रस्त्यावर भरदिवसा तरुणाचा खून; तिघे संशयित ताब्यात

शहरातील सोयगाव इंदिरानगर रस्त्यावर भरदिवसा तरुणावर पाच जणांच्या टाेळक्याने धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याचा प्रकार घडला. अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर मंगळवारी (ता.११) दुपारी पाऊणेदोनच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. वराह चोरी व पालन करण्याच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. कॅम्प पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
डीके चौक ते सोयगाव चौफुली या नव्याने सिमेंट कॉंक्रीटीकरण झालेल्या रस्त्याला लागून असलेल्या इंदिरानगर जोड रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या सुनील बाजीराव गुंजाळ (३८, रा. गवळी वाडा, कॅम्प) या तरुणाच्या मागावर असलेल्या दुचाकीस्वारांनी धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकविण्याच्या नादात सुनील दुचाकीसह खाली कोसळला. यानंतर तो रस्त्याने पळत सुटला. पाठोपाठ दुचाकीस्वार तरुणांनी दुचाकीवर त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा खून केला. बघ्यांना काही कळण्याच्या आतच हल्लेखोर दुचाकीने पसार झाले. रस्त्यानजीकच सोयगाव येथील पोलिसपाटील कैलास पाटील हे एका निवासस्थानी बसले होते. दुचाकी पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने ते धावत गेले असता दूर अंतरावर तरुणाचा पाठलाग करणारे हल्लेखोर त्यांना दिसले
 पाटील यांनी कॅम्प पाेलिसांना तातडीने ही माहिती कळवली. वराह पालन करणाऱ्या वडार समाजातील नागरिकांमध्ये वराह पालनाची हद्द व विभाग ठरलेला असतो. त्या वादातूनच हा खूनाचा प्रकार घडल्याचे समजते.या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश काळे सहकाऱ्यांसह अवघ्या काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी उपस्थितांकडून संशयितांची माहिती घेतली. यानंतर कॅम्प पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवत तिघा संशयितांना ताब्यात घेतले.मयत सुनीलचे चुलते दादाजी काशिनाथ गुंजाळ यांच्या तक्रारीवरुन कॅम्प पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खून प्रकरणातील अन्य दोघा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e