कॉस्टिक सोड्याची दुधात भेसळ; सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये रॅकेट उद्ध्वस्त

कपडे धुण्याचा सोडा व आरोग्यास घातक रासायनिक पावडर च्या साह्याने भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दापाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने केला. शनिवारी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात ही कारवाई करत पोलिसांनी सुमारे अकरा लाख रुपये किमतीचे भेसळीसाठी वापरली जाणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका दूध संकलन केंद्रात भेसळयुक्त दूध बनवणारे रॅकेट कार्यरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांना याबाबत सूचित करत श्री. पाटील यांनी गुन्हे शाखेच्या विशेष पथकामार्फत सापळा रचून हे रॅकेट उध्वस्त केले. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा मिरगाव येथील ओम सद्गुरु दूध संकलन केंद्रात मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत होते. डेअरी चालक संतोष विठ्ठल हिंगे, प्रकाश विठ्ठल हिंगे दोघे रा. मिरगाव ता सिन्नर यांना भेसळयुक्त दूध बनवताना रंगेहात पकडण्यात आले. या ठिकाणी पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा कास्टिक सोडा आढळून आला. हिंगे बंधूंच्या घराची देखील यावेळी झेडपी घेण्यात आली तेथे देखील याच रसायनांचा साठा लपवून ठेवला असल्याचे उघड झाले. सदर डेअरी मध्ये वरील रसायनांचा पुरवठा करणाऱ्या हेमंत श्रीहरी पवार रा. उजनी याच्या घरी छापा टाकत पोलीस पथकाने तेथून अकरा लाख रूपये किमतीचा तीनशे गोणी मिल्क पावडर व सात गोणी कास्टिक सोडा जप्त केला. हेमंत पवार हा दूध भेसळीच्या व्यवसायात कुप्रसिद्ध असून त्याचेवर यापूर्वी देखील कारवाया झाल्या आहेत.हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?जप्त केलेल्या मुद्देमालाची अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. लोहकरे यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. त्यानंतर वरील तिघांचे विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली.विशेष पथकातील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक निरिक्षक प्रल्हाद गिते, शांताराम नाठे, दिपक आहिरे, विनोद टिळे, गिरीष बागुल, अनुपम जाधव, मेघराज जाधव, किशोर बोडके, साईनाथ सांगळे, भगवान काकड, सविता फुलकर, चालक हेमंत वाघ यांनी ही कारवाई यशस्वी केली.पहाटे पाच वाजल्याासूनच पोलीस पथकाने डेअरीच्या परिसरात वेशांतर करून व शेतामध्ये लपून सापळा रचला होता. सकाळी नियमित दूध संकलन आटोपल्यावर दोघे हिंगे बंधू प्लास्टिकच्या दोन कॅनमध्ये काही मिश्रण घेऊन आले.ते डेअरीत पोहोचल्यावर पथकाने छापा टाकला तेव्हा संकलित केलेल्या दुधामध्ये ते पांढऱ्या रंगाचा द्रवरूप पदार्थ मिश्रित करत होते. मिल्क पावडर आणि कास्टिक सोडा एकत्र करून बनवलेले हे मिश्रण होते.दोन्ही पदार्थांची दुधामध्ये केलेली भेसळ प्राणघातक असून प्रतिबंधित पदार्थांची भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार पोलिसांनी उघडा पाडला.उजनी येथून ताब्यात घेतलेला हेमंत पवार हा दूध भेसळीच्या व्यवसायात प्रसिद्ध आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात त्याचे मोठे नेटवर्क असून डेअरी चालकांना मिल्क पावडर कास्टिक सोडा तसेच आरोग्यास घातक असलेल्या रसायनांचा तो पुरवठा करतो.
वर्षभरापूर्वी पाथरे येथे दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला होता त्यात देखील केमिकल सप्लायर म्हणून हेमंत पवार यांचे नाव पुढे आले होते. वावी पोलीस ठाण्यातच त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.सिन्नर तालुका दूध संकलनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. गावोगावी दूध संकलन केंद्रे थाटण्यात आली असून यापैकी बहुसंख्य केंद्रांमध्ये भेसळयुक्त दुधाचा गोरख धंदा तेजीत आहे. अन्न व औषध प्रशासनातले अधिकारी यापासून अनभिज्ञ आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.डेअरी व्यवसायिकांच्या चर्चेनुसार भेसळीचे रॅकेट चालवणारे डेअरी चालक या अधिकाऱ्यांना वरचेवर मलिदा देतात. त्या बदल्यात अधिकाऱ्यांकडून कानाडोळा करण्यात येतो.मिरगाव येथे झालेल्या आजच्या कारवाई त देखील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उशिराने घटनास्थळी पोहोचले होते. या डेअरी चालकाकडून देखील अधिकाऱ्यांना हप्ता पोचवला जात असल्याची उघड चर्चा ऐकायला मिळाली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e