अहमदनगर : मराठा समाज तसेच धनगर समाज आरक्षणानंतर आता नाभिक समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला आहे. नाभिक समाजाला आरक्षणासाठी ओबीसीऐवजी अनुसुचित जातीमध्ये (एससी) समावेश करावा, मागणीसाठी नगरमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने उपोषण सुरू आहे. याला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी (१४ सप्टेंबर) राज्यभरातून पदाधिकारी येणार आहेत. याशिवाय नगर जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी आपली सलून आणि इतर दुकाने बंद ठेवून कुटुंबासह आंदोलानत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर हे या आंदोलनाचे केंद्र बनले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर शाखेच्यावतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तपोवन रोड येथील संत सेना महाराज भवन येथे तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. नाभिक समाजाच्यावतीने शांताराम राऊत, विकास मदने, शिवाजी दळवी, अरुण वाघ, अजय कदम, उमेश शिंदे उपोषणाला बसले आहेत.
यासंबंधी शांताराम यांनी सांगितले, आरक्षण मिळावे या मागणीसाठी नाभिक समाज १९८५ पासून लढा देत आहे. नाभिक समाजाचा एस.सी.प्रवर्गात समावेश करण्यात यावा, अशी मागणी समाज सातत्याने करत आहे. मात्र शासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरु राहील.
विकास मदने म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यात नाभिक समाजाचा एस.सी. प्रवर्गात समावेश केलेला आहे. परंतु महाराष्ट्रात नाभिक समाज हा ओबीसी प्रवर्गातच येतो. त्यामुळे अनेक सोयी-सुविधांपासून हा समाज वंचित राहत आहे, त्यामुळे केंद्रात एस.सी.चा असलेला प्रवर्ग दर्जा महाराष्ट्र सरकारनेही द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.
जोपर्यंत नाभिक समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका घेतनाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी (१४ सप्टेंबर) राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत. याशिवाय नगर जिल्ह्यातील नाभिक समाजाने आपली सलून दुकाने बंद ठेवून तसेच नाभिक समाजातील सर्व बांधव, खलिफा समाजातील सर्व बांधव, तसेच नोकरदार वर्ग यांनी कुटुंबासह यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments