अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे असं या बंदीचे नाव असून तो खुनाच्या गुन्ह्यात २६ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हा कारागृहातील कोव्हीड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे.२८ ऑगस्ट २०२३ रोजी कारागृहातील शिपाई विकास महाजन व त्यांचे सहकारी सुरेश बडगुजर, संदीप थोरात, नितीन सपकाळे यांची रात्रपाळी ड्युटी होती. सायंकाळी ६ वाजता ते ड्युटीसाठी कारागृहात हजर झाले.
२९ रोजी रात्री १२.१० वाजेच्या सुमारास सुरेश बडगुजर, नितीन सपकाळे यांच्याकडून ड्युटी चार्ज देवाण-घेवाण करीत असताना अचानक कोव्हीड बॅरेकमधील बंद्यांची आरडाओरड चालू झाली. त्यामुळे या सर्व जणांनी कोव्हीड बॅरेककडे धाव घेतली. यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल सोनवणे याने पांढऱ्या रंगाच्या बागायतदार रुमालाने बॅरेकमधील कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला.
कारागृहातील पोलिसांनी त्या बॅरेकमधील बंदींना गळफास घेतलेल्याचा पाय पकडून ठेवण्यास सांगितले. एकाने त्याच्या गळ्यातील रुमाल सोडवून त्याला खाली उतरवित त्याचा जीव वाचविला.त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. शिपाई विकास महाजन यांच्या फिर्यादीवरून बंदी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.
0 Comments