श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरून गावातील सावकारी करणाऱ्या आणि विविध गुन्हे दाखल असलेल्या आरोपी नानासाहेब गलांडे आणि इतर पाच आरोपींनी अमानुष मारहाण केली होती. मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि हात-पाय बांधून झाडाला उलटे टांगून त्यांना क्रूर वागणूक दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया आरोपीं विरोधात उमटत आहे. सध्या पीडित युवकांवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून दलित संघटनां, विविध पक्षांचे नेते पीडितांची भेट घेत आहेत.
येत्या 1 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हरेगावमध्ये येत असून पीडितांची ते भेट घेतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, प्रतीक बारसे, योगेश साठे,अनिल जाधव आदींनी दिली. प्रकाश आंबेडकर यांचा राहुरी इथे उंबरे प्रकरणी अल्पसंख्याक समाजाची सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी आंबेडकर हरेगाव इथे जाऊन पीडित कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचीही हरेगाव पीडितांची भेट 1 सप्टेंबरलाच ठरली होती. मात्र दिल्लीत महत्वाची बैठक असल्याने आठवले यांचा दौरा 1 तारखेला न होता लवकरच ते पीडितांची भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती आरपीआयचे(आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी सरकारनामा'ला दिली आहे.
या घटनेचा निषेध विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून केला जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घटनेनंतर तातडीने रुग्णालयात मारहाण झालेल्या युवकांची भेट घेतली. आरोपींवर कडक कारवाईच्या त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेतील मुख्य आरोपी नानासाहेब गलांडे याची हरेगाव परिसरात मोठी दहशत असल्याचे पुढे आले असून अद्याप तो फरार आहे.त्याच्या अटकेची मागणी काँग्रेस पक्षाचे नेते चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री आणि भाजप नेते दिलीप कांबळे, ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे. या सर्व नेत्यांनी पीडितांची भेट घेतली आहे. नगर जिल्ह्यात जातीय अत्याचाराच्या घटना सर्वाधिक का असा प्रश्न हंडोरे यांनी उपस्थित केला असून या प्रकरणाला कोणीही जातीय वळण देऊ नये असे आवाहन दिलीप कांबळे यांनी केले आहे.
0 Comments