नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या सिंधी कॉलनी परिसरात बुधवारी पहाटे तीन वाजता थरारक जबरी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करत वयोवृद्ध नागरिकावर हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. कपाटावर डल्ला मारत २५ तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या जबरी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाने भेट दिली असून, चोरट्यांच्या तपासासाठी विविध पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे घटनेत जखमी झालेल्या नानकानी यांनी आपबीती सांगितली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरात बुधवारी पहाटे जुनी सिंधी कॉलनीतील व्यापाऱ्याच्या घरात जबरी दरोडा पडला. पडलेल्या दरोड्यात एकूण ६ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. लेखराज खिलमल नानकाणी या वृद्धाला बंदुकीचा धाक दाखवून व वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवला गेला. लेखराज खिलमल नानकाणी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोर त्यांनी किचनच्या खिडकीची जाळी तोडून घरात केला असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पथके नेमली असून परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण ही तपासण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील पुतळ्याजवळ नेहरु जयहिंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक नरेशकुमार लेखराज नानकाणी हे जुनी सिंधी कॉलनीत झुलेलाल नगरात राहतात. त्यांच्या घरात वडील लेखराज खिलमल नानकाणी, आई मिरादेवी, पत्नी व मुले सोबत राहतात.बुधवारी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना त्यांच्या घरातील स्वयंपाक घरातील खिडकीची जाळी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी मिरादेवी यांच्या गळ्यावर चाकू ठेवून धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने काढले. त्यावेळी आरडाओरड केली तर जीवे मारण्याची धमकी दिली.
घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने जबरीने काढत असताना कपाट उघडण्याचा आवाज आल्याने लेखराज नानकानी यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर मारुन दुखापती केले. आरडा ओरड केली तर गोळी मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील इतर बेडरुमला बाहेरून दोरीने बांधण्यात आले होते. त्यामुळे मदतीला कुणी येऊ शकले नाही.लेखराज नानकानी यांच्या सांगण्याप्रमाणे तिघा दरोडेखोरांपैकी एकाने त्याचे तोंड काळ्या रंगाच्या कपड्याने बांधलेले होते तिघे जण सडपातळ असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 Comments