ट्रकच्या चोरकप्प्यातून विदेशी मद्याची तस्करी; एक्साईजची महामार्गावरील दहावा मैल येथे कारवाई

मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शिवारात दहाव्या मैलावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला हुलकावणी देऊन पसार होणाऱ्या ट्रकला अडवून झडती घेतली असता, ट्रकमध्ये चोरकप्पा बनवून विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. सदरचे मद्य गोव्यात विक्रीसाठी असलेले आढळून आले असून, चालकासह दोघांना अटक केली आहे
साहिल लियाकत सय्यद, मुकेश रमेश गाढवे असे अटक करण्यात आलेले चालक व क्लीनर आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला (एक्साईज) मुंबई-आग्रा महामार्गावरून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, अधीक्षक शशिकांत गर्जेे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण व दिंडोरीच्या भरारी पथकाने महामार्गावरील ओझर शिवारातील दहावा मैल याठिकाणी सापळा रचला होता.संशयित सहाचाकी ट्रक (एमएच १५ एचएच ४३७५) आले असता, पथकाने रोखण्याचा इशारा केल्यानंतरही चालकाने ट्रक हुलकावणी देत पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने पाठलाग करून ट्रक अडविला.
ट्रकची झडती घेतली असता, चोरकप्पा बनविण्यात येऊन त्यामध्ये गोव्या राज्यात विक्रीस परवानगी असलेले विदेशी मद्याचे १४३ बॉक्स आढळून आले. विदेशी मद्य व ट्रक असा ३२ लाख १४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल एक्साईजने जप्त केला आहे.सदरची कामगिरी एक्साईजचे उपायुक्त डॉ. बी.एच.तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अ.सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.के. सहस्त्रबुद्धे, के.एन. गायकवाड, ए.एस. पाटील, एस.व्ही. देशमुख, एस.के. शिंदे, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विलास कुवर, गोरख गरुड, गणेश शेवगे, पोपट बहिरम, योगेश साळवे, दीपक नेमनार, केशव चौधरी, वीरसिंग पावरा यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e