बदलत्या काळानुरूप माणसाच्या राहणीमानात देखील अमुलाग्र बदल झालाय. आधुनिकतेच्या आजच्या काळात सुंदरतेला असाधारण महत्व प्राप्त झालेय. साहजिकच मुंबई-ठाण्या सारख्या आधुनिक शहरात मानवी रुपाला उजाळा देणार्या स्पा, ब्युटी सलून, मसाज पार्लर यांची संख्या देखील झपाट्याने वाढतेय. मात्र या सुंदरता मिळवून देणार्या व्यवसायाला आता काहीसा डाग लागू पाहत असून मसाज पार्लर, स्पा, ब्युटी सलून यांच्या चार भिंतीआड चालणारा अनैतिक व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चाललाय.
ठाण्यातील आनंदनगर, कावेसर या उच्चभ्रू परिसरात असलेल्या ली पोश युनिसेक्स स्पा मध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास मिळाली होती. याच माहितीच्या आधारे 31 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास या स्पावर छापा टाकण्यात आला. तेव्हा तिथे मागणीनुसार शरीर विक्रयासाठी मुली पुरविण्यात येत असल्याचे समोर झाले. या कारवाईमध्ये स्पा चालविणार्या एका पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या तावडीतून या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली .
या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा अनैतिक व्यवसायाला चाप बसावा आणि या व्यवसायात मोठ्या प्रमाणात होणारी मानवी तस्करी थांबावी म्हणून ठाणे पोलिसांनी 2010 साली मानवीय तस्करी विरोधी पथकाची स्थापना केली होती. या गलिच्छ व्यवसायात अडकलेल्या 500 हुन अधिक पीडित महिलांची सुटका पथकाने व ठाणे पोलिसांनी आता पर्यंत केली आहे. त्यात बांगलादेशी महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.
दीड वर्षात पिटा कायद्यांन्वये 83 दलालांना अटक
गेल्या दीड वर्षात पिटा कायद्यांव्ये एकूण शंभरहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात 83 दलालांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईअंतर्गत 75 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 11 अल्पवयीन मुली आहेत. तर 12 बांगलादेशी व 4 नेपाळी तरुणींचा समावेश आहे. फक्त पोलीस कारवाईने हे सगळं थांबणार नसून त्यासाठी समाजाने देखील पुढाकार घ्यायला हवा असं सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया कुलकर्णी सांगतात.
0 Comments