बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी धुळे जिल्ह्यात ५ भरारी पथके गठित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक व्ही. बी. जोशी यांनी दिली. खरीप हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत उपलब्ध व्हावीत. म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही पथके गठित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरावर ४ व जिल्हास्तरावर १ अशी एकूण ५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी.
बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावा. पेरणी झाल्यावर बियाणे पाकीट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे. शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करू नये. कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्याची अंतिम मुदत तपासून घ्यावी. गाडीवरून खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करू नये. कुठेही असे फ्लाय सेलर्स आढळून आले, तर तत्काळ 02562-234580 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0 Comments