आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रूर हत्या:प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीच्या गळ्यावर 14 वार; ‘तू गेलीस, मीही येतोय’ म्हणत हल्लेखोर पळाला

शिक्षण, करिअरच्या वाटा शोधण्याच्या वयात प्रेमाच्या हट्टापायी २० वर्षीय शरणसिंग सेठी (२०) याने सुखप्रीतसिंग कौर ऊर्फ कशिश (१८) या सुशिक्षित कुटुंबातील तरुणीची अत्यंत निर्दयीपणे क्रूर हत्या केली. वर्षभरापासून तो सातत्याने तिचा पाठलाग करत होता. सुखप्रीतसिंगसह तिच्या कुटुंबाने त्याची वारंवार समजूत घातली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी त्याने पाठलाग न करण्याचे आश्वासनही दिले. मात्र ते पाळले नाही. शनिवारी (२१ मे) सुखप्रीतसिंग मैत्रिणीसह एका कॅफेत गेली. शरणसिंग तिच्यापाठोपाठ गेला व तिला बोलण्यासाठी हट्ट करू लागला. इतकेच नव्हे तर हाताला पकडून तिला कॅफेबाहेर आणले व मोकळ्या प्लॉटवर नेऊन धार्मिक शस्त्र कृपाणने तिच्या गळ्यावर एकापाठोपाठ १४, पोटात तीन वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास देवगिरी कॉलेजच्या मागील भागात ही थरारक घटना घडली. शरणसिंगच्या एकतर्फी प्रेमाच्या हट्टापायी दोन भावांची लाडकी बहीण असलेल्या निष्पाप सुखप्रीतसिंगचा मात्र बळी गेला. १८ मे रोजी अशाच प्रेमप्रकरणातून नारेगावात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या झाली होती. तीन दिवसांत ही दुसरी घटना घडली. १८ वर्षीय सुखप्रीतसिंग देवगिरी कॉलेजला बीबीए पहिल्या वर्षात होती. तिचे वडील प्रीतपालसिंग ग्रंथी चिकलठाण्यातील कंपनीत नोकरी करतात, तर आई हरजित कौर गृहिणी आहे. मोठा भाऊ हरप्रीतसिंग (२४) हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, तर लहान भाऊ सनप्रीतसिंग शिकतो. शनिवारी सुखप्रीतसिंग नेहमीप्रमाणे मैत्रिणींसोबत सकाळी ११ वाजता महाविद्यालयात गेली. दोन वाजेपर्यंत तिथे थांबल्यानंतर मैत्रीण दिव्या खटलाणीसोबत ती महाविद्यालयाच्या मागील बाजूने रचनाकार कॉलनीत असलेल्या एका कॅफेवर कॉफी पिण्यासाठी गेली. शरणसिंग तिच्या मागावरच होता. तिथे जाऊन त्याने सुखप्रीतसिंगशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिला एकटीलाच बोलायचे आहे, असे सांगून त्याने दिव्याला खालीच थांबण्यास सांगितले व सुखप्रीतला घेऊन कॅफेत वरच्या मजल्यावर गेला. काही वेळातच त्याने तिला खाली ओढत आणले. काय झाले हे दिव्यालाही कळले नाही. दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास सुखप्रीतसिंगच्या हाताला धरून शरणसिंग तिला ओढत ओढत २०० मीटर अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटकडे गेला. काहीतरी अघटित होणार याची शंका आल्याने दिव्या मागोमाग गेली. मात्र काही क्षणांत शरणसिंगने कृपाण हे शस्त्र काढून सुखप्रीतसिंगच्या गळ्यावर सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् शरणसिंग पळून गेला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या दिव्याने आरडाओरड केली. पण सोसायटीतील घराचे दरवाजे बंद होते. कुणीही बाहेर आले नाही. काही विद्यार्थी, तरुण हा प्रकार पाहत होते. मात्र, कुणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर दिव्या कॅफेकडे आली व तेथील लोकांना सांगितले, त्यानंतर ते धावून आले. रक्तबंबाळ सुखप्रीतला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात नेले. पण तिचा मृत्यू झाला होता. उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक प्रमोद देवकाते यांनी धाव घेतली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दोघांच्या घराकडे धाव घेतली. सायंकाळी वेदांतनगर पोलिसांनी शरणसिंगवर खुनाचा गुन्हा दाखल केला.| मैत्रीण मदतीसाठी याचना करत राहिली; पण जमाव पाहत राहिला
सुखप्रीतसिंगवर शरणसिंगने तब्बल १७ वार केले. गळ्याच्या डाव्या बाजूने पाच, उजव्या बाजूने नऊ वेळा कृपाण खुपसले. त्यानंतर त्याच गळ्याला पकडून पोटात तीन वेळेस वार केले. टोकाच्या संतापात केलेले वार इतके खोल व गंभीर होते की गळ्याच्या दोन्ही बाजूंनी अक्षरश: सुपारीएवढ्या आकाराचे छिद्र पडले. दिव्याच्या समोर हा प्रकार घडत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुखप्रीतसिंगकडे पाहून ‘तू गेलीस, आता मीही तुझ्यामागे येतोय, असे म्हणत शरणसिंगने शस्त्रासह तेथून पोबारा केला. रेल्वेस्थानकाच्या दिशेने गेल्याचे सांगितले जाते. तो रेल्वेने पळून गेल्याचा प्राथमिक संशय आहे. वेदांतनगर पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेची दोन पथके त्याचा शोध घेत होते. रेल्वेस्थानकावरच त्याने मोबाइल बंद केला. रात्री उशिरा पोलिसांचे एक पथक आरोपीची बहीण राहत असलेल्या लासलगावकडे गेले होते.
शरणसिंग आधी एका गॅरेजवर काम करायचा, आता तो बेरोजगार आहे. सुखप्रीतसिंगच्या मैत्रिणींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शरणसिंग आधीपासून महाविद्यालयात येऊन थांबला होता. तो तिची वाटच पाहत होता. कॉलेजच्या जिन्याजवळच त्याने सुखप्रीतसिंगला अडवले. ‘मला बोलायचं आहे, वर चल’ असा हट्ट त्याने सुरू केला. मात्र, सुखप्रीतसिंग वारंवार त्याला नकार देत होती. त्याचा राग आल्याने तो तेथेच तिच्या अंगावर धावूनदेखील गेला. मात्र, विद्यार्थी बरेच असल्याने तो तेथून मागे फिरला. मात्र, दीड वाजता पुन्हा गाठून अखेर त्याने तिची हत्या केली.
आठ दिवसांपूर्वी वाद, शरणसिंगला मारहाण शरणसिंगच्या त्रासाला कंटाळून सुखप्रीतसिंगने घरीदेखील कल्पना दिली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबाने सहा महिन्यांपूर्वीच त्याला समजावून सांगितले. दोन महिन्यांपूर्वी तिच्या भावाने त्याला पाठलाग न करण्याची समज दिली. मात्र तरीही त्याचे वागणे न बदलल्याने आठ दिवसांपूर्वीच सुखप्रीतसिंगच्या नातेवाइकांनी शरणसिंगला मारहाण केल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले. मात्र, सर्व मोठ्यांनी हस्तक्षेप करत प्रकरण मिटवले होते. परंतु शरणसिंगने शेवटपर्यंत ऐकले नाही.
0 Comments