मंडळ अधिकारी प्रशांत ढोले यांनी शहर पोलिसांत या गुन्ह्याची फिर्याद दिली. तलाठी बाळू सानप यांच्यासोबत ते गस्तीवर असतांना हिंगोणी गावाजवळ अरुणावती नदीपात्रातून वाळूचा उपसा करुन वाहतूक करणारे ट्रॅक्टर त्यांना आढळले. त्यांनी ट्रॅक्टर चालक छोटू भिल याची चौकशी केली असता वाळू उपसा आणि वाहतुकीचा परवाना त्याच्याकडे आढळला नाही. वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याच्या संशयावरुन ढोले व सानप यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
दोघा अधिकारींना उतरविले खाली
ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर शिरपूरकडे नेत असतांना दुचाकीवरुन आलेले संशयित ट्रॅक्टरमालक अमन याकूब गिरासे व समाधान राजेंद्र कोळी यांनी त्यांना रोखले. ढोले यांचा हात पकडून खाली खेचले; तर तलाठी सानप यांच्यावर फावडे उगारुन त्यांना खाली उतरण्यास भाग पाडले. छोटू भिल याला चिथावणी देऊन वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर पळवण्यास सांगितले. संशयित दुचाकीने पळून गेले. मंडळ अधिकारी ढोले यांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन संशयित अमन गिरासे, समाधान कोळी व छोटू भिल (तिघे रा.वनावल ता.शिरपूर) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणून दोन लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, 75 हजार रुपये किंमतीची ट्रॉली व चार हजार 500 रुपयांची वाळू असा एकूण दोन लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याच्या संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments