चाळीसगाव शहर परिसरात वादळाचा तडाखा

चाळीसगाव (जळगाव) : जिल्‍ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. यात आज (९ जून) चाळीसगाव शहर परिसरात सायंकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. टिळक चौकातील शाळा क्रमांक एकजवळील टपऱ्यांवर झाड पडल्याने तीन टपऱ्यांचे नुकसान झाले तर कचेरी परिसरातही मालवाहू टेम्पोवर झाड पडले. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या वादळामुळे विशेषतः शहरी भागात मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक  वादळाला सुरवात झाली. अशातच पाऊसही सुरु झाल्याने रस्त्यावरील दुकानदारांसह नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही वेळातच वादळाचा जोर वाढल्याने शहरातील अनेक भागात झाडे अक्षरशः उन्मळून पडली. गणेश रोडवरील दुकानांच्या बाहेर लावलेले बोर्ड वाऱ्याने उडाले. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असतानाच काही वेळाकरीता वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या वादळी पावसाचा जोर शहरी भागातच सर्वाधिक होता. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शहरवासीयांना ३० ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

अनर्थ टळला

शहरातील टिळक चौकातील शाळा क्रमांक एकजवळील टपऱ्यांवर झाड पडल्याने तीन टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झाड पडले त्यावेळी टपऱ्यांमध्ये कोणीही नसल्याने अनर्थ टळला. असाच काहीसा प्रकार शिवाजी घाटावरील हरीहरेश्‍वर मंदिराजवळ घडला. वादळामुळे येथील वडाचे झाड उन्मळून पडले. हा परिसर अत्यंत गजबजलेला असतो. मात्र, झाड पडले त्यावेळी पाऊसही सुरु असल्याने कोणीही या भागात नसल्यामुळे अनुचित घटना घडली नाही 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e