नंदुरबार, 16 जून : नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा गावात नदी पात्रात बुडुन तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही तिन्ही चिमुकले देवानंद नदी ओलांडून पलीकडे असणाऱ्या हेंगलाचा पाडा येथे दुकानावर खाऊ आणण्यासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली.
दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने नदी काहीशी प्रवाहीत झाली आहे. त्यातच या चिमुकल्यांना नदीतील खड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. बुधवार दुपारी साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
एकाच गावातील या तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत निलेश दिलवर पाडवी वय 4 वर्षे, मेहर दिलवर पाडवी वय 5 वर्षे आणि पार्वती अशोक पाडवी वय 5 वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नदी-नाल्याला पाणी
दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस उतका होता की, अनेक ठिकाणी नदी-नाल्यांत भरपूर पाणी आले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान झाले. तर झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू चौपाटीवर एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आहे. तर एका जणाला वाचवण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू चौपाटीवर 14 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती. चौपाटीवर समुद्रात खेळत असताना अचानक चौघे जण पाण्यात बुडले. पाण्यात बुडालेल्या मुलांचं वय हे 16 ते 21 वर्ष दरम्यान असल्याचे सांगितलं जात आहे. यामध्ये 2 भावांचा समावेश आहे. तर इतर दोन जण हे त्यांचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेतून एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे.
0 Comments