आंतरजातीय विवाहाचा नाशिक मध्ये गोड शेवट

जातीव्यवस्था ही भारतीय समाजव्यवस्थेला लागलेली कीड आहे. ती नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाहाला पर्याय नाही. परंतु अजूनही भारतात आंतरजातीय विवाह मोठया मनाने स्वीकारले जात नाहीत हेच दिसून येते.


नाशिक मध्ये मागील आठवड्यात असाच प्रकार घडला. पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विशाल पाठक या ब्राह्मण समाजातील युवकाने कोमल जाधव या बुद्धिस्ट मुलीशी दि. 22 मे 2022 रोजी नाशिक येथील एका स्थानिक विवाह केंद्रात वैदिक पद्धतीने विवाह केला व विवाहाचे प्रमाणपत्र ही त्यांना मिळाले. सदर विवाह दोघांच्या सहमतीने झाला व दोघेही सज्ञान होते तरी मुलीच्या घरच्यांनी 3 दिवसानंतर तिला मुलाच्या घरातून त्याच्या व आईच्या समोर धमकी देऊन घेऊन गेले त्यामुळे त्याने पुण्यातील परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राकडे मदतीसाठी फोन केला.
त्याने पोलिसांना संपर्क ही केला परंतु त्यांनी घरगुती मॅटर म्हणून गांभीर्याने घेतले नाही. मुलगा मुलीच्या प्रेमापोटी आत्महत्या करायची भाषा करत होता, रडत होता व अनेकदा पोलिसांकडे जाऊन आला. परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राच्या कार्यकर्त्यांनी त्याला मानसिक आधार दिला व आम्ही सर्व सोबत आहोत, घाबरू नकोस म्हणून धीर दिला. मुलगी अज्ञान आहे हा डाव ही मुलीच्या घरच्यांनी खेळून पाहिला परंतु तो यशस्वी झाला नाही. दीड दोन महिन्यांपूर्वीच मुलीने 18 वय पूर्ण केल्याचे पुरावे मुलाकडे असल्यामुळे ते यावर गप्प झाले. केंद्र सरकारने मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा कायदा आणला आहे. परंतु अद्याप तो लागू झालेला नाही. सदर कायदा संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविला गेला आहे.
मुलीच्या घरचे मुलाला धमकावत होते व तिचा आम्ही इतकी वर्षे सांभाळ केला आहे त्यासाठी दोन लाख रुपये दे व मग तिला घेऊन जा इ. म्हणत होते. मुलगा गरीब असल्यामुळे हे अवघड होते.
परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्राने तातडीने नाशिकचे पोलीस आयुक्त (CP) जयंत नाईकनवरे व पंचवटी पोलीस स्टेशनचे Sr. PI यांना ई-मेल करून तातडीने लक्ष घालण्यासाठी व दोघांना संरक्षण देण्याची विनंती केली. नाशिक मधील बुद्धिस्ट समाजातील एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश वैद्य तसेच इतर कार्यकर्त्यांनी ही यात लक्ष घातले व मदत केली.

मुलाने आमच्या डॉ. कौस्तुभ यांना कळवले की 26 मे च्या मध्यरात्री उशिरा मुलीच्या घरच्यांनी त्याच्या पत्नीला जबरदस्तीने त्याच्या घरातून घेऊन गेले असून त्यामुळे मुलाने पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिसांनी यावर फक्त अदखलपात्र गुन्हा नोंद करून मुलीच्या घरच्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही किंवा त्यांना समज दिलेली नाही तसेच अद्याप मुलीला तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊ दिले नाही. मी, इनायत परदेशी व डॉ. कौस्तुभ त्याच्या संपर्कात होतो व त्याला धीर देऊन कायदेशीर मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. 2-3 दिवस पोलीस स्टेशनला जाण्यात गेले. आम्ही छगन भुजबळ (नाशिकचे पालकमंत्री) यांनाही ई-मेल + फोन करून लक्ष घालण्यासाठी कळवणार होतो. परंतु त्याच्या आधीच मुलाने फोन करून गुड न्यूज कळवली. तो खूप आनंदात होता व आमचे आभार मानले. कॉ. राजू देसले व जयवंत खडतळे हेही मुलासोबत पोलीस स्टेशनला हजर होते. या सर्वांनी केलेले प्रयत्न कामी आले. पोलिसांनी दि. 1 जूनला मुलीच्या घरच्यांना बोलावून, समजावून सांगून लेखी लिहून घेऊन तिला मुलाच्या घरी जाऊ दिले आहे.

राज्य व केंद्र सरकारची अश्या प्रकारच्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला दिली जाणारी आर्थिक मदत या जोडप्याला मिळवून देण्यासाठी ही परिवर्तन विवाह केंद्र मदत करत आहे. कोणाला अश्या केसेस मध्ये मदत हवी असल्यास किंवा आंतरजातीय / धर्मीय विवाह करायची इच्छा असल्यास (प्रथम वर / विधवा / विधूर / घटस्फोटित इ. सर्व) परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्र पुणे यांना खालील फोन नंबर किंवा ई-मेल वर संपर्क करावा. -
8600929360
9011891964

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e