भाचीच्या वाढदिवसाला आला अन् भलतंच काम करून बसला आता आली पश्चातापाची वेळ

उल्हासनगर - भाचीच्या वाढदिवसासासाठी नांदेडहून आलेल्या एका चोरट्यानं उल्हासनगरात अवघ्या ४ दिवसात तब्बल ६ घरफोड्या केल्याचं समोर आलं आहे. या चोरट्यासह एकूण तिघांना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत.उल्हासनगर परिमंडळ ४ मध्ये जुलै महिन्यात घरफोड्यांचं प्रमाण चांगलंच वाढलं होतं. त्यात १५ ते १८ जुलै या अवघ्या ४ दिवसात उल्हासनगरच्या हिललाईन, विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे ६ गुन्हे घडल्यानं पोलिसांकडून या घरफोडी करणाऱ्यांचा कसून शोध घेतला जात होता.

या प्रकरणात पोलिसांनी राजू मिरे, परमेश्वर गायकवाड आणि प्रकाश पवार या तिघांना सापळा रचून अटक केली. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीने पोलिसही अचंबित झाले. कारण यापैकी राजू मिरे हा मूळचा नांदेडचा राहणारा असून त्याची बहीण अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळी परिसरात वास्तव्याला आहे. या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस असल्यानं राजू हा नांदेडहून नेवाळी परिसरात आला होता.

मात्र इथं येताच त्यानं परमेश्वर गायकवाड, प्रकाश पवार आणि अन्य २ साथीदारांच्या मदतीने थेट घरफोड्या करायला सुरुवात केली. यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी त्यांनी केली. मात्र अचानक वाढलेलं घरफोड्यांचं प्रमाण पाहून पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या टोळीला बेड्या ठोकल्या.

 तिघांकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल असा एकूण १२ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यापैकी राजू मिरे याच्याविरोधात यापूर्वी तेलंगणा राज्यातील अदीलाबाद आणि नांदेड इथं ७ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचे इतर २ साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e