लातूर : लातूर येथील सम्राट चौक येथून चोरीला गेलेल्या बोलेरो पिकअपसह दोन आरोपींना २४ तासात अटक करण्यात गांधी चौक पोलिसांना यश आले आहे. यावेळी पोलिसांनी १४ लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे.
लातूर शहरातील सम्राट चौक येथून एमएच २४ एफ ९८३६ या क्रमांकाचा बोलेरो पिकअप चोरीला गेला होता. २८ जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी पिकअप लंपास केली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास करीत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली. चोरीस गेलेले पिकअप वाहन वैराग ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर एका ढाब्याच्या बाजूला लपवून ठेवलेले आहे, अशी माहिती मिळाली. पोलीस पथकाने या माहितीच्या आधारे वैराग ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर पाहणी केली. पथकाने या परिसरात सापळा लावला. दरम्यान, पिकअपमध्ये दोन व्यक्ती बसत असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता अकबर हसन शेख, सचिन शेषेराव मोरे अशी त्यांची नावे आहेत.
0 Comments