मागील भांडणात झालेले वाद मिटविण्यासाठी जमलेल्या मित्रांच्या बैठकीतच एका तरुणावर जमावाने तलवारीने हल्ला करत त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात मध्य रात्री दिड वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद इब्राहिम समसुदोहा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून मालेगावात खुन केला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अफजल खान, कासीम, असलम खान, जफर उल्ला खान, अमन उल्ला खान ऊर्फ पहिलवान, वसीम भांजा यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व संशयित आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद इब्राहिम याला उपचारार्थ सामान्य रुग्णालय आणि तेथून खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी करत आहेत.
0 Comments