अहमदनगरमधील सेवानिवृत्त मुख्याधापकांसोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुख्याध्यापकाने डोक्याला हात मारून घेतला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दगडू मिस्त्री असे रक्कम गमावलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे नाव आहे. दरम्यान सीसीटीव्ही आधारे राहुरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरात भर बाजारपेठेत असणाऱ्या महाराष्ट्र बँकेमध्ये २ जुलै रोजी दुपारी पैसे काढण्यासाठी दगडू मिस्त्री हे आले होते. बँकेतून दोन लाख रुपयांची रक्कम काढून ती त्यांनी एका पिशवीमध्ये ठेवली होती. त्यांनी ही पिशवी बँकेच्या खाली उभ्या असलेल्या त्यांच्या दुचाकीला अडकवली. ते गाडीवर बसणार तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने मिस्त्री यांना तुमचे पैसे खाली पडले आहेत अशी बतावणी केली. मिस्त्री यांनी रस्त्यावर बघितले असता दहा, वीस, पन्नास अशा शंभर रुपयांच्या नोटा त्यांना रस्त्यावर पडलेल्या निदर्शनास आल्या.
या नोटा गोळा करत असतानाच त्या अनोळखी व्यक्तीच्या दुसऱ्या साथीदाराने दुचाकीच्या हँडलला लावलेली पैशांची पिशवी घेऊन पोबारा केला. मिस्त्री हे आपल्या गाडीजवळ आले असता त्यांना पैशाची पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले. आपण फसले गेलो याची जाणीव होताच त्यांनी आजूबाजूला बघितले. मात्र तोपर्यंत ते दोन्हीही भामटे तेथून परागंदा झाले होते. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
0 Comments