शिरूर : कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या तरूणाला सापळा रचून पकडले

 शिरूर - शहरातील एका महाविद्यालयानजीक कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या तरूणाला शिरूर पोलिसांनी सापळा रचून पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे दोन काडतूसांसह एक गावठी पिस्तुल आढळून आले. काल रात्री उशिरा झालेल्या या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली.

अरबाज रशीद खान (वय २३, रा. बाबुराव नगर, शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्याविरूद्ध आर्म ॲक्ट नूसार बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून सुमारे वीस हजार रूपये किमतीचे गावठी पिस्तुल व चारशे रूपये किंमतीचे काडतूस जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संस्थांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने शरीरविषयक गुन्ह्यांमधील वाढ रोखण्यासाठी व कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा, विनापरवाना हत्यारे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्यानंतर पोलिस दल अलर्ट झाले असून, त्याअनूषंगाने झाडाझडती सुरू केली असताना ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अरबाज खान हा कंबरेला पिस्तूल लावून शहरालगत हुडको कॉलनीजवळील एका महाविद्यालयाजवळ फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, राजेंद्र गोपाळे, आकाश नेमाने, पवन तायडे, संतोष साळुंके, बापू मांगडे या पथकाने सापळा लावून त्याला घेरले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढला. मात्र चोहोबाजूंनी घेरून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडे काडतूसांसह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले असून, खान याला अटक करण्यात आली. खान याने हे पिस्तूल विक्रीसाठी आणले होते कि कुठे घातपात घडविण्याचा त्याचा इरादा होता, याविषयी माहिती घेतली जात असून, शिरूर न्यायालयाकडे त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e