अमळनेर, (जि.जळगाव) - आई व मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमळनेरमध्ये समोर आली आहे. येथे एका महिलेने ‘कोरोना’मुळे पती गमावल्याने उपजीविकेचे साधन नसल्याने चक्क आपल्या पोटच्या सात मुलांना विकण्याचा बेत आखला. मात्र, विक्री करताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेने त्या मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) असे महिलेचे नाव आहे.
शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलांची विक्री करीत असल्याची माहिती येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अधिक तपासासाठी पोलिस पथकाला महिलेचा शोध घेण्यासाठी पाठविले. या पथकाने संबंधित महिलेला गाठून तिची चौकशी केली. यावेळी ती भांबावलेल्या अवस्थेत दिसून आली.
तिच्यासह सोबतच्या तीन मुली व चार मुले यांना पोलिस ठाण्याला आणण्यात आले. या महिलेच्या ताब्यातील मुलांबाबत चौकशी केली असता सोबतची मुले त्या महिलेचीच अपत्ये असून, तिच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तिच्याकडे उपजीविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती स्वत:च्या मुलांची इच्छुक लोकांना विक्री करीत होती. मुलांना विकणे बेकायदेशीर असल्याचे सांगून तिला समज देण्यात आली.
मुलांची बालसुधारगृहात रवानगी
भविष्यात महिला मुलांना विकून टाकण्याची शक्यता असल्याने तीन मुली व चार मुलांना संरक्षण व पालनपोषणासाठी बालकल्याण समिती, जळगाव येथे हजर करून त्यांची रवानगी महिला बालसुधारगृहात करण्यात आली. या कारवाईवेळी पोलिस निरीक्षक हिरे, उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस कर्मचारी नाजिमा पिंजारी, दीपक माळी, रवींद्र पाटील उपस्थित होते.
0 Comments