लग्नात अश्लील नृत्य करणाऱ्या पुण्यातील नृत्यांगणांना कोल्हापूर पोलिसांचा दणका

कोल्हापूर: लग्नाच्या वरातीत अश्लील हावभाव करत नृत्य करणाऱ्यांना तरुणींना कोल्हापूर पोलिसांनी दणका दिला आहे. पुण्याच्या दोन नृत्यांगणांसह आठ जणांवर वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच गाणी वाजवणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉलीसह डॉल्बी सिस्टीमही पोलिसांनी जप्त केली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्याच्या भादोले गावातील ही घटना आहे 

मिळालेल्या माहितीनुसार, भादोले गावात एका लग्नाच्या वरातीत नाचण्यासाठी दोन नृत्यांगणांना बोलवण्यात आले होते. संध्याकाळच्या वेळी लग्नाची वरात जोमात असताना सर्वजण डॉल्बीच्या तालावर बेधुंद नाचत होते. तेव्हा या नृत्यांगणांनीही नाचायला सुरुवात केली, यावेळी नाचताना त्यांनी काही अश्लील हावभाव केले. पुण्यात राहणाऱ्या युगश्री शेरकर आणि अंजली थापा असं या दोन नृत्यांगणांचं नाव असून त्या इन्स्टाग्रामवरही प्रसिद्ध आहेत, तसेच त्यांच्या फॉलोअर्सही संख्याही हजारोंच्या घरात आहे. लग्नात सार्वजनिकरीत्या अश्लील हावभाव आणि नृत्य केल्याने या दोघींसह इतर आठ जणांवर वडगाव पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

या अश्लील नृत्याचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली आहे. नृत्यांगनांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी लोक पुढे पुढे येत आहेत. लग्न कार्यक्रमात अशा प्रकारचे डान्सचं आयोजन करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूरात या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोणाच्या लग्नाच्या निमित्ताने या डान्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणात वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e