नाशिक | प्रतिनिधी नाशिकमधून एका अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे....
आज तालुका पोलीस स्टेश येथे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अधिक माहिती अशी की, ओझर शहरातून एका 14 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. या मुलीचा शोध घेण्यासाठी ओझर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
यादरम्यान, या मुलीला एक महिला नेताना दिसून आली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. वेगवेगळी पथके तयार करून ती तपासासाठी पाठविण्यात आली.
याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रियंका देविदास पाटील, रा. कार्बन बाका, सातपुर, नाशिक सध्या ओझर, ता. निफाड या महिलेला ताब्यात घेण्यात आले. या महिलेला पिडीत मुलीबाबत विचारपुस केली असता तिने तिची मैत्रिण नागे रत्ना कोळी, रा. ओझर, १० वा मैल, ता. निफाड हिच्या मदतीने शिरपुर येथील एक महिला व पुरुषास ०१ लाख ७५ हजार रुपये किंमतीस विक्री केल्याचे समोर आले.
या प्रकरणाबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने तपास पथक गुण पथकास मार्गदर्शक सुचना देवुन धुळे जिल्हा व गुजरात राज्यात रवाना केले. त्याप्रमाणे ओझर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने शिरपुर, जि. धुळे परिसरातुन महिला रत्ना विक्रम कोळी, रा. ओझर, १० वा मैल, ता. निफाड, सुरेखाबाई जागो मिला, रा. शिरपुर, जि. धुळे यांना गुन्हयाच्या तपासासाठी ताब्यात घेतले.
या महिलांना पिडीत अल्पवयीन मुलीबाबत विचारपुस केली असता, त्यांनी या मुलीस बडोदा, राज्य गुजरात या ठिकाणी लग्नासाठी दिले असल्याचे सांगितले. त्यावरून तपास पथकाने गुजरात राज्यात याठिकाणी ठिकाणी जाऊन पिडीत मुलीचा शोध घेतला.
यानंतर ही मुलगी मध्यप्रदेश राज्यातील खरगोण जिल्हयात असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने लागलीच खरगोण, राज्य मध्यप्रदेश याठिकाणी रवाना झाले.
याठिकाणी बाबुराम येडु मनसारे, गोविंद नानुराम मनसारे रा. लखापुर, ता.भिकनगाव, जि. खरगोण, राज्य मध्यप्रदेश यांच्या घरात ही अल्पवयीन पिडीत मुलगी मिळुन आली. तिला पोलिसांनी सुखरुपरित्या ताब्यात घेतले.
तसेच वरील दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्हात संशयित महिला व पुरुषांनी यातील अल्पवयीन मुलीस परराज्यात लग्न लावुन देण्यासाठी फूस लावुन पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच यातील आरोपीनी यापूर्वी देखील इतर पिडीत मुलींना अशाच प्रकारे लग्नासाठी फुस लावुन पळवून नेले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्व संशयितांनी व त्यांचे परराज्यातील इतर साथीदारांनी यापुर्वी देखील नाशिक जिल्हयातील अल्पवयीन मुलींना फूस लावुन पळवून नेवुन आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हयातील अल्पवयीन मुलींना फुस लावुन पळवून घेवून जाणारे परराज्यातील रॅकेट उघडकीस आलेले असून यातील आरोपीचे इतर साथीदारांचा नाशिक ग्रामीण पोलीस कसोशिने शोध घेत आहेत.
या तपासकार्यात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे व पोउनि जी. ए. जाधव, पोहवा आहिरराव, पोना थारबळे, मोरे, पोका जाधव, डंबाळे, बागुल, मपोना पानसरे हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.
0 Comments