मिळालेल्या माहितीनुसार, पवन छोटेलाल यादव हे रामनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. त्यांची स्टेशन डायरीवर ड्यूटी असल्याने ते सोमवारी ११ वाजता पोलीस ठाण्यात कर्तव्यावर गेले होते. घरात पवन यादव यांची पत्नी पूनम, दोन मुली आणी सासू घरी होते. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर पूनम यादव यांना आवाज करायचा नाही, ओरडायचे नाही, तुमच्याकडे जे काही पैसे, सोनं असेल ते द्या अशी धमकी दिली. तेवढ्यातच त्याने पवन यादव यांच्या लहान मुलीला उचलून तिच्या गळ्याला चाकू लावला आणि जे घरात आहे ते दे, नाही तर तुझ्या मुलीला मारुन टाकेल अशीही धमकी दिली.
मुलीच्या जीवाच्या भीतीपोटी पूनम यादव यांनी कपाटात ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचे दोन हार, सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याची चैन, सोन्याचा झुमका, सोन्याचे कानातले, सोन्याचे मंगळसूत्र, असे एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने काढून दिले.
यानंतर चोरट्याने मुलीला सोडून दागिने बॅगमध्ये भरत दुचाकीने पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत पूनम यादव यांनी घटनेची माहिती पती पवन यादव यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. मात्र, पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने सामान्य नागरिक काय सुरक्षित राहणार? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
0 Comments