वन कार्यालयातील वॉचमनचा मुलगा संशयित जॉन सुनील लोखंडे (वय २९, रा. वन वसाहत) याचीही रवानगी कारागृहात झाली आहे. आठ दिवसांच्या तपासात वन पथकाने बरेच मुद्दे संकलित केले असले, तरी चोरीची ही कातडी आणली कुठून याची उकल झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे, वन कार्यालयाच्या वॉचमनचा मुलगा मुख्य सूत्रधार असूनही मूळ कारण अस्पष्ट आहे. अवघ्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातून तीन टोळ्यांना बिबट्याच्या कातडीची तस्करीत अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. संशयित लोखंडेसह सिद्धांत मनोज पाटील (वय २१, रा. सर्वेश्वर कॉलनी, कॉलेजरोड) आणि रोहित एकनाथ आव्हाड (वय १९, रा. सातपूर) यांना या प्रकरणी अटक झाली.
संशयित लोखंडेच्या वडिलांचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे चौकशी झाल्याचे समजते. पण, त्यातूनही महत्त्वाचे धागेदोरे पथकाच्या हाती लागलेले नाहीत. लोखंडेचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. इतर दोघांपैकी एक जण फार्मसी, तर दुसरा बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. या तिघांच्या इतर साथीदारांचेही जबाब नोंदवण्यात आले. त्यापैकी काहींना तस्करीबाबत कल्पनाही नव्हती, अशी माहिती पुढे आली. मात्र, आता तिघांचीही रवानगी कारागृहात झाल्याने पुढील तपासाची दिशा काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
0 Comments