सध्याच्या स्थितीत त्यांचे एक बंधु शरद गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. ते माजी आमदार आहेत. त्यांच्या दोन्ही कन्या राजश्री आणि जयश्री या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. त्यांचे दुसरे भाऊ प्रकाश गावित स्वतंत्र आहेत. ते पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. त्यांची पत्नी पंचायत समिती सदस्य आहे. तर त्यांचा मुलगा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या कोपर्ली गटाच्या पोटनिवडणुकीत पराभूत झाला, अन्यथा तो देखील सदस्य असता. मंत्री विजयकुमार गावित यांचे तिसरे भाऊ राजेंद्र गावित भाजपचे नेते असुन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आहे. २०१९ मध्ये तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. एकंदर हे चित्र म्हणजे नंदुरबारच्या सर्व वैधानिक संस्थांचे गावित यांच्याशिवाय पानही हालत नाही. सर्व पदे त्यांच्याकडेच एकवटली आहेत. मात्र भाजपच्या दृष्टीने हे घराणेशाहीत मोडत नाही. जनतेने देखील त्याला घराणेशाही म्हणू नये हेच बरे.
महिनाभरापासून जिल्हा परिषदेवरील सत्तांतराबाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम मिळाला. काँग्रेसला खिंडार पाडत काही सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांची बहुमताने विजयी झाली. हे पद पदरात पाडण्यासाठी पडद्यामागून तसेच अन्य काय काय घडले असेल हे सांगण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने ही उमेदवारी दिली होती. जर एखाद्या सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर हे शक्य झाले असते का? असा प्रश्न पडतो.
जिल्हा परिषदेवरील सत्तांतर काँग्रेस व शिंदे गटाच्या शिवसेनेला बहुमत असताना, ही सत्ता हातून निसटल्याबाबत मंथन करायला लावणारी आहे. जिल्हा परिषदेवर सत्तांतराचे वारे अनेक दिवसांपासून वहात होते. भाजपने विशेषत: आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपची सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली होती. एकीकडे राज्य शासनात भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेची युती असताना, नंदुरबार जिल्हा परिषदेत असेच समीकरण घडेल, असे वाटत होते. मात्र, शिंदे गटाच्या शिवसेनेने मागील महाविकास आघाडीतील पक्षांसोबत केलेल्या लेखी करारानुसार स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेच्या निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला पुन्हा बाजूला राहावे लागणार होते.
अर्थात, भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. केवळ २० सदस्य असताना भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेस गटाचे पाच सदस्य व उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे दोन आणि राष्ट्रवादीचे चार, अशा ११ सदस्यांची जुळवाजुळवा करून ३१ सदस्यांचा आकडा गाठला.
0 Comments