जामणी येथील पोलीस पाटलांनी ३० मार्च २०२२ रोजी नागपूर ते अमरावती मार्गावरील हेटीकुंडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. याविषयी कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. मृतकाची ओळख पटविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन, नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, भंडारा, गोंदीया, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन हरवलेल्या व्यक्तींची तपासणी केली. घटनास्थळातील आणि परिसरातील तांत्रिक बाबींवर भर देऊनही पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, कोंढाळी पोलीस ठाण्यात मिसींग नोंद असून त्यातील हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन सदर गुन्ह्यातील मृतकाच्या वर्णनाशी मिळते-जुळते असल्याचे दिसले. हरविलेल्या व्यक्तीचे नाव डोरीलाल उर्फ राजू बन्सीलाल नागवंशी असे होते. तर पत्ता(रा. जरूड, ता. वरूड, जि. अमरावती) होता. पोलिसांनी या व्यक्तीच्या मुलाशी म्हणजे प्रकाश राजू नागवंशी आणि त्याची आई सुमित्रा डोरीलाल नागवंशी यांना अनोळखी मृतकाचे फोटो दाखवले. त्यानंतर मृत व्यक्तीच्या मुलाने हे त्याचे वडील डोरीलाल उर्फ राजू नागवंशी असल्याचे तसेच सुमित्रा नागवंशी यांनी त्यांचे पती असल्याचे सांगितले
ओळख पटल्यावर पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी ओम नामदेवराव पठाडे (वय ३६), (रा. सावळी खुर्द) आणि सुनिल वामनराव ढोबाळे (वय ३२) रा. सावळी (खुर्द) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. डोरीलाल नागवंशी याच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता, ओम नामदेव पठाडे याच्याकडील ३ गायी मृतक डोरीलाल नागवंशीने चोरी करुन विकल्याचे सांगतले. तसेच डोरीलालने उसने घेतलेले १४ हजार रूपयेसुध्दा परत देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याची हत्या केल्याचे आरोपींनी मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह पथकाने घटनेच्या कालावधीतील महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या संपूर्ण वाहनांची माहिती घेतली. तसेच येथील जवळपास ७००० वाहने तपासण्यात आली. यासाठी वेगळे पथक नेमले होते. अशात आता नऊ महिन्यांनंतर खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाला बक्षिस जाहीर केले आहे.
0 Comments