हाडाखेड नाक्यावर अवैध शस्त्रांचा साठा जप्त

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथील चेक पोस्टवर मारुती अर्टिगा कारमधून तलवारी, गुप्त्या, चॉपर, चाकू, फाइट आदी अवैध  शस्त्रांचा साठा सांगवी पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) दुपारी जप्त केला.
शस्त्रांची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून दहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित धुळे तालुक्यातील जुन्नेर व लळिंग येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिली.मारुती सुझुकी अर्टिगा कार (एमएच ०४, एफझेड २००४)मधून शस्त्रांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी हाडाखेड चेक पोस्टवर सापळा रचला. पळासनेरकडून शिरपूरच्या दिशेने येणारे संशयित वाहन थांबविण्यात आले. कारची झडती घेतली असता १२ लोखंडी तलवारी, दोन लोखंडी गुप्त्या, एक चॉपर, एक बटण घडीचा चाकू, दोन लोखंडी फाइट अशा शस्त्रांचा साठा आढळला
संशयित सतपाल गिरधर सोनवणे (वय २५, रा. लळिंग), किरण नंदलाल दुधेकर (मराठे, वय २७, रा. जुन्नेर), विकास देवा ठाकरे (वय ४०, रा. लळिंग), सखाराम रामा पवार (वय ४५, रा. लळिंग), सचिन राजेंद्र सोनवणे (पाटील, वय २८, रा. अवधान), राजू अशोक पवार (वय २६, रा. जुन्नेर),विशाल विजय ठाकरे (वय २७, रा. लळिंग), संतोष नामदेव पाटील (वय २२, रा. जुन्नेर), अमोल शांताराम चव्हाण (वय २०, रा. जुन्नेर) व विठ्ठल हरबा सोनवणे (वय ३८, रा. लळिंग) यांचा समावेश आहे. कारसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख २९ हजार १०० रुपये आहे. संशयितांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, प्रभारी डीवायएसपी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, हवालदार जाकिरोद्दीन शेख, चतरसिंग खसावद, पवन गवळी, संजय सूर्यवंशी, पोलिस नाईक आरिफ पठाण, संदीप शिंदे, रोहिदास पावरा, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांनी ही कारवाई केली.शस्त्रे कशासाठी?पोलिसांनी अटक केलेले बहुतांश संशयित जुन्नेर व लळिंग येथील रहिवासी आहेत. त्यांच्यात ट्रॅक्टरचालक व मजुरांचा भरणा आहे. संशयितांना इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रे कशासाठी हवी होती, त्यांचा वापर करून कोणता गुन्हा करण्याचा कट होता, परिसरातील संभाव्य टोळीयुद्धाची ती सुरवात होती का, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e