मुलीवर वाईट नजर टाकणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मक्याच्या शेतात आढळला होता मृतदेह
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तरहाडी गावातील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतातून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचे हात बांधलेले होते. त्यावरून संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांना सहज आला. मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या हत्येबाबत कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांना पुढील तपासात अडचणी येत होत्या.
असा’ लावला हत्याकांडाचा छडा
मृत व्यक्तीच्या खिशातून राज्य परिवहन बसचे तिकीट सापडले. या तिकिटामुळे धुळे पोलिसांचे पथक थेट मध्य प्रदेश आणि गुजरातमधील पोरबंदरपर्यंत पोहोचले. मृत व्यक्तीने परिधान केलेल्या अंगठीत मुकेश हे नाव लिहिले होते, परंतु मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती यामुळे अक्षरे वाचण्यास कठीण झाले होते. मिळालेल्या तिकिटावरुन मयत इसम चोपडाहून शिरपूरला आल्याची माहिती मिळाली.
तिकिटात नोंदवलेल्या तारखेच्या आधारे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासले. या फुटेजमध्ये एक महिला पुरुषासोबत बसलेली दिसत होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुकेश बरेली याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सुशील उर्फ मुसळ्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वासुदेव कोळी आणि जीतू उर्फ तुंगाऱ्या लकडे पावरा यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. हे सर्व आरोपींना गुजरातमधील पोरबंदर येथून अटक केली.
0 Comments