प्रश्न : माझी समस्या ही आहे की जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर मी वजन कमी करू शकत नाही आहे. माझी सासू स्वतः खूप लठ्ठ आहे पण मी कधीच तिची तिच्या शरीरावरून वा वजनावरुन खिल्ली उडवलेली नाही.. पण ती मात्र तिच्या कुटुंबासमोर माझी सतत चेष्टा करते, मला लठ्ठपणा वरून घालून पाडून बोलते. मला सतत वाटते की ती मुद्दाम माझा अपमान करते. मी माझ्या नवर्याला याबद्दल सांगितले आहे, पण त्याने सुद्धा मला समजून न घेता मी खूप अतिविचार करते असे म्हणून माझे म्हणणे खोडून काढले.
तिने एकदा माझ्या वहिनीसमोर माझ्या गरोदरपणाआधी आणि गरोदरपणानंतर कुर्त्याची साईज किती वाढली आहे हे बिनबोभाट पणे सांगितले. ही गोष्ट मला अजिबात सहन झाली नाही आणि मी एकटीच रडत बसले होते. मला यावरून मला घरात भांडण नको आहे, पण मला हे सगळचं थांबवायचं आहे. मी काय करू?
यावर उत्तर देताना डॉक्टर रचना म्हणतात की, तुमची मानसिक स्थिती किती कमकुवत झाली असेल हे मी समजू शकते. तुमच्या बाबतची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्हाला थेट सासू विरोधात बोलायचे नाही. कारण त्यामुळे घरात भांडणे होणार याची तुम्हाला भीती आहे. तुम्ही या त्रासात सुद्धा अवघ्या घराचा विचार करताय ही मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला या समस्येतून बाहेर पडायचे असेल तर सगळ्यात पहिली एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे सामंजस्याने आपली बाजू मांडणे.
तुमचा नवरा किंवा सासू यांच्याशी थेट बोलण्यापेक्षा शांतपणे बसून, वाद होणार नाहीत या पद्धतीने तुमची बाजू आणि तुम्हाला होणारी समस्या त्यांना सांगा. बोलताना तुमचा सूर आदरयुक्त असेल याची खात्री बाळगा. बॉडी शेमिंगच्या त्रासामुळे तुम्ही किती दु:खात आहात आणि तुमच्या मनात काय काय विचार येत आहेत ते त्यांना सांगा. शिवाय तुम्ही घरासाठी किती काय करता आणि एक सून म्हणून आजही तुमचे सर्वांवर प्रेम आहे हे पटवून द्या.
गरोदरपणानंतर वजन वाढणे ही एक शारीरिक समस्या आहे हे सर्वात आधी तुमच्या घरातल्यांना पटवून द्या. तुमचे वजन वाढले आहे त्याला तुम्हीच कारणीभूत आहात हा गैरसमज प्रथम त्यांच्या मनातून निघून जायला हवा. हा समज जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्याबद्दल त्यांना सहानुभूती वाटू शकते. त्यामुळे या समस्येबद्दल त्यांना जागृत करण्यावर भर द्या.
जर काहीही करून ही समस्या संपत नसेल आणि तुमची सासू तुम्हाला बोलच लावत असेल तर अशावेळी एकदम जवळच्या एखाद्या व्यक्तीशी बोला. त्यांना तुमचे दु:ख सांगा. कदाचित ते तुम्हाला यातून बाहेर पडण्यास मदत करू शकतील.
खरं तर दुनिया बदण्यापेक्षा स्वत:ला बदलणं कधीही सोपं आणि चांगलं असतं. सासू किंवा समाज तुमच्या शरीराचा तिरस्कार करतो, खिल्ली उडवतो म्हणून तुम्हीही रडत बसून शरीराचा राग राग करण्यापेक्षा स्वत:वर प्रेम करायला शिका. जसे आहात तसे स्वत:ला आत्मविश्वासाने स्वीकारा. जेव्हा आपणच आपल्यावर प्रेम करतो किंवा सुंदर समजतो तेव्हा दुनियेला तुम्हाला कधीच डिप्रेशनच्या जाळ्यात ढकलू शकत नाही किंवा कोणाच्याच बोलण्याला तुम्ही सीरीयसली घेऊ शकत नाही. याव्यतिरिक्त नुसतं प्रेम करून फायदा नाही त्या शरीराचे लाड करा, त्याला आपल्या बाळाप्रमाणे जपा… मग का नाही वजन कमी होणार? केल्याने सारं शक्य असतं फक्त प्रयत्न सुरू करा अन् हार मानू नका. असं जेव्हा कराल तेव्हा नवरा आपोआपच तुमच्याकडे आकर्षित होईल अन् आईची चूकही त्याला समजेल.
0 Comments