राज्यात सध्या ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण चांगलेच गाजत आहे. कोट्यवधींच्या ड्रग्ज तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटील प्रकरणाने नाशिकमधील मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ड्रग्जरॅकेट प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून कोट्यवधींचे कोकीन जप्त केल्याची बातमी समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, DRI च्या पुणे, मुंबई आणि अहमदाबाद टीमने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. DRI च्या या कारवाईत छत्रपती संभाजीनगर शहरात कोट्यवधी रुपयांचे कोकेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कोकेनची किंमत तब्बल ५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही. या कोट्यवधी रुपयांच्या कोकेनसोबत दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, नाशिकनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठ्या प्रमाणात कोकेन सापडल्याने खळबळ उडाली असून शहरातील मोठे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. याआधी मुंबई नाशिक तसेच सोलापूरमधूनही मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही कोकेनचा साठा सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
0 Comments